पवारांना तेवढे भाजपमध्ये घेऊ नका
मुंबई नगरी टीम
अमरावती : साडेचार वर्षे भाजपवर जोरदार टीका केल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाजपच्या इतर पक्षांतून नेते आयात करण्याच्या धोरणावरून चिमटा काढला.ठाकरे म्हणाले की,आता टीका करायची कुणावर हा प्रश्न आहे.आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाहीतर भाजपमध्ये दिसायचे. आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही, त्यांना तेवढे भाजपमध्ये घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत आज झाला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युती हा फेव्हिकॉलचा जोड आहे, तुटणार नाही, असे सांगितले.मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबई पूल दुर्घटनेचा उल्लेखही केला नाही.सर्व भाषण राजकारणावरच होते.
ते म्हणाले की, शिवसेना-भाजपकडून उघड तलवारी काढल्या होत्या.काही गोष्टी झाल्या,त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतरा. आमच्यात जो संघर्ष झाला तो आम्ही विकासाच्या आणि राज्याच्या आड येऊ दिला नाही, असे त्यांनी सांगितले.देशासाठी बाळासाहेब आणि अटलजींनी केला तो मोठा संघर्ष आहे. आधीच्या काळात आमच्यासोबत येत कोण होतं? आम्हाला धर्मवादी म्हणायचे मात्र आमच्या मागच्या पिढीने जो संघर्ष केला, त्यामुळे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, असे ठाकरे म्हणाले.