भाजप शिवसेनेच्या असंवेदनशीलतेचा कळस
मुंबई नगरी टीम
पुणेःमुंबईत काल सीएसटी स्थानकाला जोडणारा पूल कोसळून सहा जण बळी गेले तर कित्येक जखमी झाले. मात्र घटनास्थळी आणि रूग्णालयात न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमरावतीला संयुक्त प्रचारासाठी गेले. यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.भाजप आणि शिवसेनेच्या असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका केली आहे.
अजित पवारांनी ट्विट करून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,मुख्यमंत्र्यांना म्हणे आघाडीच्या डोळ्यातले पाणी दिसते आहे.तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाच्या हलगर्जीपणामुळे आलेले सामान्य मुंबईकरांच्या डोळ्यातले पाणी दिसत नाही का?,असा जोरदार टोला अजित पवारांनी लगावला आहे.मुंबईकरांना वाऱ्यावर टाकून प्रचार करणे हा भाजपा-शिवसेनेच्या असंवेदनशीलतेचा कळसच आहे,अशी टीका त्यांनी केली.विरोधी नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की,ओपन जिमच्या उद्घाटनांच्या फालतू कार्यक्रमांना उद्धव ठाकरे हजर असतात.पण जेथे लोकांना धीर देण्याचा प्रश्न आहे, तेथे ते कधीच नसतात,अशी टीका मलिक यांनी केली.