बीडमध्ये राष्ट्रवादीला नाराजीचे ग्रहण
मुंबई नगरी टीम
बीड : लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला नाराजीचे लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमरसिंह पंडित यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला कसेबसे यश मिळाले.मात्र आता मुंदडा गट प्रचारात उतरणार नसल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याला नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांचे समर्थक आणि कार्यकर्ते हजर राहिले नाहीत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अक्षय मुंदडा गैरहजर राहणे याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी धूमसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंदडा गटाला नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही,अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. एक महिन्यापूर्वीच केज मतदारसंघाची सूत्रे पूर्णपणे देण्याची मागणी केली होती. पण ती धुडकावून लावण्यात आली.त्यामुळे मुंदडा यांनी निवडणुकीत अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीला मुंदडा गटाच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचे नेतृत्व करत असलेल्या धनंजय मुंडे यांना आपल्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात नाराजीला सामोरे जावे लागत आहे.सोनवणे यांच्या उमेदवारीवरून सुरू झालेला विरोध शमण्याचे नाव घेत नाही. राज्यात लक्ष देण्यास कार्यक्षम असलेले मुंडे जिल्ह्यातील नाराजीचे आव्हान कसे मोडून काढणार,असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.