राष्ट्रवादी काँग्रेसने किमान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवावी
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या वर्धा येथील पहिल्या सभेला गर्दी नव्हती अशी टिका करणाऱ्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विधानाचा शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज खरपूस समाचार घेतला. ४४ अंश सेल्सियस तापमानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन या सभेला निदान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवा, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील वर्धा येथील पहिल्या सभेला लोकांची गर्दी नव्हती असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. हा दावा खोडून काढताना तावडे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज वर्धा येथे आज झालेल्या सभेला सुमारे १ लाख लोकांची गर्दी होती.
‘पळ काढणारे चोर नाही, चौकीदार असतात’ या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘आदर्श’ सारखा मोठा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना त्यांना काही वाटत नाही का? चंद्रपूर च्या उमदेवारीवरुन ‘पक्षात माझे कोणी ऐकत नाही’, अशी जाहीर कबुली देणाऱ्या अशोक चव्हाणांनी का पळ काढला.निवडणूकीत बायकोला लढण्यासाठी पुढे करतात त्यावरून लोकांना कळते की, कोण पळ काढतय अशी टिकाही त्यांनी केली.
गुळाच्या ढेपेच्या मुंगळ्याप्रमाणे मुख्यमंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत, असे बोलणाऱ्या भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे व हे सरकार घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेला चिकटून राहण्याची गरज नाही. जनतेनेच आमच्यावर संपूर्ण विश्वास टाकल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहोत.