राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे वाढविली
मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्रे असणार आहेत.
विशेष म्हणजे नाशिकमध्ये २७४ वाढीव मतदान केंद्रे, पुण्यामध्ये २३७ आणि ठाण्यामध्ये २२७ वाढीव मतदान केंद्रे असणार आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल.साधारणपणे १ हजार ४०० मतदारांमागे १ मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसात मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्राचीही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने २ हजार १६७ मतदान केंद्रे राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. याचाच अर्थ आता एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्रे असणार आहेत.
२००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९७ हजार ६४० मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान १५ प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.