सरकारला लाज कशी वाटत नाही

सरकारला लाज कशी वाटत नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षातल्या अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा पूर्तता ना करताना पुन्हा मते मागायला येताना सरकारला लाज कशी वाटत नाही या टॅगलाईनच्या माध्यमातून महाआघाडी सरकारला जनतेच्या मनातील प्रश्न विचारणार आहे,  अशी माहिती काँग्रेस खा.हुसेन दलवाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आज गांधीभवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महाआघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणेची आणि प्रचारातील मुद्द्यांची माहिती, तसेच ऑडीओ, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर कशापध्दतीने सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे याची माहिती सादरीकरणासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी दिली.

पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. दलवाई म्हणाले की सरकारने मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले असून मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरूण, विद्यार्थी, छोटे व्यापारी दलित अल्पसंख्यांक, आदिवासी असे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत . मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा? अशी जनतेची भावना आहे. सरकारने दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन पाळले नाही उलट तरूणांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला. नोक-या मागणा-यांना पकोडे तळायला सांगताना लाज कशी वाटत नाही? मुली पळवून नेण्याची भाषा करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणा-या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही. पंधरा लाखाचे आश्वासन देऊन फसवणूक करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? ऑनलाईनच्या नावाखाली शेतक-यांना कर्जमाफी नाकारणा-या सरकारला मते मागताना लाज कशी वाटत नाही? हे जनतेच्या मनातील प्रश्न महाआघाडी सरकारला विचारणार आहे असे खा. दलवाई म्हणाले.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, देशभरातील ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांविषयी २ मिनिटेही बोलले नाहीत. गेल्या पाच वर्षातील शेतक-यांच्या दुरावस्थेसाठी मोदी मागच्या सरकारला दोष आहेत मग मोदींनी गेल्या पाच वर्षात नेमके काय केले? असा संतप्त सवाल मलिक यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांमुळे गुजरातचा विकास झाला हे सांगणारे मोदी आता निवडणुकाच्या तोंडावर पवार साहेबांवर टीका करत आहेत पण राज्यातील जनतेला सत्यस्थिती माहित आहे. आमचा नेता हिटविकेट होणारा नाही तर क्लीनबोल्ड करणारा आहे असा टोला त्यांनी मोदींना लगावला. तसेच मोदींनी सभा घेऊन काहीही फरक पडणार नसून गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा येथे भाजपचा पराभव करून महाआघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्ये करणा-या चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेताना मलिक म्हणाले की, भाजीवाल्यांच्या मागे गजरे घेवून फिरणारे मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी चंपेगिरी सोडावी, त्यांच्यात हिम्मत असेल तर अजितदादा पवार यांची चौकशी करुन दाखवावी. तुम्हाला कुणी अडवले आहे, नाही तर जनताच तुमची चंपी करेल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

गुजरातमध्ये जाऊन मऊ मऊ ढोकळा खाऊन आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज दगा नही देना हे आज सांगत आहेत. यावेळी दगा नही देना जमाना खराब है  हे गाणं वाजवून सामनामध्ये आलेल्या मुलाखतीची खिल्ली नवाब मलिक यांनी उडवली. तसेच भाजप शिवसेनेत रडारडीचा डाव सुरु असून हो दोन्ही पक्ष एकमेकांना दगा देणार हे स्पष्ट आहे. जनतेशी दगाफटका करणार्‍यांना जनता चांगलाच दणका देणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.बीडमध्ये बिहार परिस्थिती होते आहे. तिथल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होऊनही त्यांना सोडले जात नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे पत्र उमेदवाराने दिले आहे. शिवाय लोकल पोलिस नको अशी मागणीही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देवून करण्यात आली आहे.

Previous articleभाजपा ही फेकू पार्टी  : धनंजय मुंडे
Next article…तर  राजकारणातून संन्यास घेईल