पृथ्वीराज चव्हाणांनी पुढील पंतप्रधान कोण होणार हे घोषित करावे
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा डॉयलॉग मारणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार? हे आता घोषित करावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना तावडे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण खुप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत, हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग कोण पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर करावे, असेही तावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टिका करत त्यांच्या मर्मावरच घाव घातला आहे. पंतप्रधान मोदी यांची टिका सुप्रिया सुळे यांना रुचली नाही, त्यामुळेच त्यांनी मोदीजी यांना कुटुंबाचा अनुभव नाही असे वक्तव्य केले. पण नरेंद्र मोदी यांना एक भाऊ आहे. त्यांच्या भावाला मुले आहेत. त्यामुळे काका पुतण्याला काय करतो हे मोदींच्या कुटुंबातही दिसते आहे आणि पवारांच्याही कुटुंबात दिसते आहे. त्यामुळे हे वास्तव नरेंद्र मोदी यांनी समोर आणल्यानंतर ते स्विकारण्या पेक्षा विनाकारण चिडचिड करु नये असा टोलाही तावडे यांनी सुप्रिया सुळे यांना मारला.
काँग्रेसने आज प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्याविषयी बोलताना, तावडे म्हणाले की, ‘गरीबीवर वार….. मिळणार ७२ हजार ही घोषणा म्हणजे काँगेसला ‘गरीबीवर वार वडेरा मालदार अशी करायची आहे. तसेच हम निभायेंगे या काँग्रेस जाहीरनाम्याच्या घोष वाक्यावर बोलताना तावडे म्हणाले की, हम निभायेंगेच्या हम मध्ये कोण आहेत, ममता आहेत, मायावती आहेत. अखिलेश आहे, आंध्रचे चंद्रबाबू आहेत, केरळचे आहेत, तामिळनाडूचे आहेत जे काही २५ जण रांगेत उभे आहेत, त्या हम मधला कोण आहे, हे स्पष्ट करावे नाहीतर हम आपके है कोण असे म्हणाले लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जे घोष वाक्य आहे, हम निभाएंगे हम करेंगे या हम मधील एक कोण जो नेतृत्व करेल त्याचे नाव हा जाहिरनामा घोषित करताना काँग्रेसने सांगण्याची गरज आहे आणि जर काँग्रेसने हे सांगितले तर मला अस वाटते या जाहिरनाम्याला काही अर्थ आहे बाकी या जाहिरनाम्याविषयी केंद्रातून भाजपची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे.
काँग्रेसला अखेर पुण्यामध्ये उमेदवार मिळाला, त्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करताना तावडे म्हणाले की, मोहन जोशीं सारख्या काँग्रेस कार्यकर्त्यालाच तिकीट द्यायचे होत तर इतके दिवस काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली प्रविण गायकवाडांचा प्रवेश करुन का थांबली होती, याचे उत्तर काँग्रेस पक्षाने दिले पाहिजे. पण शेवटी काँग्रेसला उमेदवार मिळाला, ही लोकशाहीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.