काँग्रेसची नोटांची बंडले सापडल्याने चौकीदाराला शिव्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : पैशाचा वापर करून मते खरेदी करण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. त्या पक्षाच्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींकडे खोकी भरून नोटा सापडत आहेत. नोटांची इतकी बंडले सापडल्यामुळे ते चौकीदाराला शिव्या देत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औसा, लातूर येथील जाहीर सभेत केली.
या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यावेळी उपस्थित होते. कडक उन्हातही सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेससाठी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे. नोटा वापरून मते खरेदी करण्याचे त्यांचे धोरण आहे. काँग्रेस नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींकडे खोकी भरून नोटा सापडत आहेत. खरा चोर कोण आहे, हे आता देशाने पाहिले आहे. चौकीदाराचे भय कोणाला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे नोटांची इतकी बंडले सापडत असल्याने ते चौकीदाराला शिव्या देत आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिनेही झाले नाहीत तरी कोट्यवधींच्या लुटीचे पुरावे सापडत आहेत. एका ठिकाणी छापा मारल्यावर तो रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचे खास सहकारी तेथे पोहचले आणि पत्रकारांचे कॅमेरे दिसल्यावर तोंड लपवून पळाले.
मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्या पक्षाच्या महाभेसळीतील साथीदारांमुळे देशात अनेक दशके सुरक्षा समस्या आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा अशी भूमिका घेणाऱ्यांना साथ दिली आहे. काँग्रेसकडून अपेक्षा नाही. पण शरदराव अशा लोकांसोबत आहेत, त्यांना हे शोभत नाही. काँग्रेस व त्या पक्षाच्या साथीदारांची विचारसरणी देशविरोधी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तीच भाषा आहे जी पाकिस्तान बोलत आहे. काँग्रेस जम्मू आणि काश्मीरच्या अराजकतावाद्यांशी बातचित करू म्हणते, हिंसाग्रस्त भागातील सैनिकांचे विशेष अधिकार काढू म्हणते, देशाला शिव्या देणारे आणि देशाचे तुकडे होऊ दे म्हणणाऱ्यांना मोकळीक मिळावी यासाठी देशद्रोहाच्या विरोधातील कायदाच काँग्रेस रद्द करू पाहते. पाकिस्तानलाही हेच हवे आहे की भारताच्या विरोधात काम करणाऱ्यांना मोकळीक मिळेल. काँग्रेसकडे अक्कल असती आणि १९४७ साली तो पक्ष ठाम राहिला असता तर देशाची फाळणी झाली नसती आणि पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती असेही मोदी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानांनी आपले छोटे भाऊ असा उल्लेख केला. काँग्रेसला मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. त्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व काढून घेतले होते आणि मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. देशातील परिवारवादी पक्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकावे. त्यांना हवे असते तर ते स्वतः मुख्यमंत्री बनले असते, त्यांना हवे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले असते पण त्यांनी तसे केले नाही. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी निरंतर काम केले आहे. आम्ही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी २२ पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान हमीभाव निश्चित केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत असेही त्यांनी सांगितले.भाजपाच्या संकल्प पत्रानुसार नवीन सरकार स्थापन झाल्यावर या योजनेचा लाभच सर्वच शेतकऱ्यांना मिळेल. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करू. चाळीस कोटी असंघटीत कामगारांना प्रथमच तीन हजार रुपये पेन्शनची योजना सुरू केली आहे. देशातील कोट्यवधी छोट्या दुकानदारांनाही पेन्शन देऊ असे आश्वासन ही त्यांनी दिले.
ते म्हणाले की, भाजपाचे संकल्प पत्र सरकारच्या कामाची दिशा दाखविणारे आहे. पण आपल्या सरकारचे काम संकल्प पत्रापुरते मर्यादित नाही. दहशतवाद्यांच्या अडड्यांवर सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करू असे आश्वासन २०१४ च्या जाहीरनाम्यात दिले नव्हते पण तसे केले. गरीबांना दहा टक्के आरक्षण किंवा प्रत्येकाला राहण्यासाठी पक्के घर, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, शौचालय, बँक खाते याची घोषणा केली नव्हती पण तसे केले. आम्ही आमचे संकल्प पत्र अंमलात आणण्यासाठी रात्रंदिवस काम करतो पण काँग्रेस मात्र मतदारांचा विश्वासघात करते.ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. ते उत्तम प्रशासक होते. त्यांनी ज्या पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केले त्यापासून महाराष्ट्राला आणि देशाला शिकायला मिळाले. आगामी काळातील पाणी पुरवठ्याचे आव्हान ध्यानात घेऊन, पुढच्या सरकारमध्ये स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा भाजपाच्या संकल्प पत्रात केली. हे मंत्रालय नदी जोड प्रकल्प, प्रत्येक घराला आणि शेताला पाणी अशी कामे हाती घेईल, असे त्यांनी सांगितले.आपल्याला आयुष्यात मिळालेली पहिली मिळकत आपण आईला किंवा देवाला देतो तसे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले पहिले मत देशाला, देश मजबूत करणाऱ्या सरकारला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले नाही, अशा शिव्या आपल्याला विरोधक देतात. जगात कोठेही काही खोटे सुरू झाले की त्याच्या आधारे माध्यमांत जागा मिळविण्याचा प्रयत्न विरोधक करतात. आपल्याला आपल्या सैन्याकडून आणि वायुदलाकडून किती पुरावे हवे आहेत ? ज्यांना आपल्या सेनेच्या शौर्यावर आपल्याला भरवसा नाही त्यांना मतदारांनी शिक्षा देण्याची गरज आहे. निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त व्हायला हवी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भर उन्हात या सभेला विक्रमी गर्दी झाली आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट केल्याशिवाय महायुती थांबणार नाही. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने साठ वर्षे राज्य केले पण अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार याखेरीज काही झाले नाही. पण पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परिवर्तन करून दाखवले. काँग्रेसने पुन्हा गरीबी हटावची घोषणा दिली आहे पण हे लोकांना मूर्ख बनविण्याचे काम आहे. गरिबांना मदत करण्यास मोदीजी आहेत, तेथे काँग्रेसची गरज नाही. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. जलयुक्त शिवारचे काम झाले नसते तर १९७२ पेक्षा वाईट स्थिती दिसली असती. सरकारने दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काम केले आहे. निवडणूक असली तरीही कार्यकर्त्यांनी दुष्काळासाठीची मदत पोहचेल यासाठी काम करावे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना २१ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत ही योजना चालूच राहील असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्यात राम मंदिर, ३७० कलम हे मुद्दे आहेत तसेच शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे. याच कारणांसाठी आपण भाजपासोबत युती केली असून जाहीरनाम्यात त्याची वचने दिल्याबद्दल भाजपाचे आभार मानतो. आधीचे सरकार दहशतवाद्यांसमोर मान तुकविणारे होते तर आताचे सरकार ठोकून काढणारे आहे. आता कुरापती काढण्यासाठी पाकिस्तानला शिल्लक ठेऊ नका, असे आपले पंतप्रधानांना आवाहन आहे. आपल्याला मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहेच. विरोधी पक्षांनी याच्या अर्धी सभा घेऊन दाखवावी आणि पंतप्रधानपदासाठी एका नावाची घोषणा करून दाखवावी, असे आपले आव्हान आहे. समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्या युतीला विजयी करा.