काँग्रेसचा भाजपावर सर्जिकल स्ट्राइक!
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपतर्फे चालवल्या जाणाऱ्या अवैध कारनाम्यांचा पर्दाफाश करुन त्यांच्या काळ्याकारनाम्यावर निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्जिकल स्ट्राइक केला आहे.
मुंबईतील खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये अनधिकृत पद्धतीने भारतीय जनता पार्टीकरता ईलेक्ट्रॉनिक कार्ड बनवण्याचे अवैध कृत्य सुरु होते. सदर कार्ड बनवण्याकरता निवडणूक आयोगाची परवानगी नव्हती, तसेच सैन्याचा वापर प्रचाराकरता करु नये असे निर्देश असताना यामध्ये सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसेच भारतीय लष्काराची प्रतिमा वापरण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रॉनिक संदेश हा रेकॉर्डच्या स्वरुपात असून हे कार्ड उघताच तो जनतेला ऐकू जावा असे ते कार्ड आहे. भाजपचे नावही स्पिकर लावून ऐकवण्यात येत होते. यामध्ये किती प्रति छापल्या हे नमूद केलेले नाही. निवडणूक आयोगाने जप्त केलेला एकूण माल ६ कोटी रुपयांचा असून प्रत्येक कार्ड ३०० रुपयांचे आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भाजपच्या कृष्णकृत्यांवर यातून प्रकाश पडला आहे. ‘मै भी चौकीदार’ म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. करोडो रुपयांचे अशाप्रकारचे प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपाचा मानस असल्याचे स्पष्ट दिसून येतो.
युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकाने स्वतःची जागा या गैरकृत्याकरता दिली होती आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे काम सुरु होते हे स्पष्ट आहे आणि या मालकाचे भाजपच्या नेत्यांशी संबंध आहेत त्यामुळे यासंदर्भामध्ये आचारसंहितेचा भंग तसेच पैशाचा गैरवापर व जनतेचा विश्वासघात करण्यात आलेला आहे. या कंपनीच्या बॉक्समध्येच ही कार्ड पाठवण्यात येणार होती. निवडणूक अधिकारी व खार पोलीस यांच्यासमोरच भाजपची ही कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने तात्काळ भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे मालक या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांनी केली आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जिया उर रहेमान वहेदी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.