रताळाला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं!

रताळाला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं!

मुंबई ‌नगरी टीम

भोकर : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळाला म्हणतात केळं आणि दुसर्‍याच्या लग्नात नाचतंय खुळं’ अशी अवस्था असलेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

राज्यातील मंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर तसेच इतर नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला सभांसाठी मंच आणि खुर्च्या किरायाने आणाव्या लागतात. पण विरोधकांची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांना माणसं, नेते आणि पक्ष किरायाने आणावे लागत आहेत आणि किरायाने आणले तरी कुणाला आणले जात आहे, जी पूर्वी होती मतदार नसलेली सेना (मनसे) आणि आता आहे उमेदवार नसलेली सेना (उनसे).

जे नेहमी पहिल्या बॉलवर आऊट होतात, ते कायम शतकं ठोकणार्‍या मोदीजींसारख्या फलंदाजाला बॅटिंग कशी करावी, याचे सल्ले देतात. होय मी बसवलेला मुख्यमंत्री आहे. पण, लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मला मुख्यमंत्रीपदावर बसविले आहे आणि याच मतदारांनी तुम्हाला घरी बसविले आहे. राज ठाकरेंनी नांदेडच्या सभेत बोलताना थोडा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. ते म्हणाले महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेण्याचे काम मी करतो आहे. पण, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा करार २०१० साली अशोक चव्हाण यांनीच केला होता. हा करार रद्द करणारा मी होतो. महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रात परत आणण्याचे काम आपण केले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्यांच्या सभांसाठी अशोक चव्हाण आग्रही आहेत, त्या राज ठाकरेंना अशोक चव्हाण हे पूर्वी बेडूक म्हणायचे आणि आज त्यांनाच सभांसाठी बोलाविले जात आहे. इतकी वाईट अवस्था काँग्रेस पक्षावर यापूर्वी कधीही आली नसेल, अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. यापूर्वीच्या सरकारने नांदेडमधील शेतकर्‍यांना कर्जमाफी, थेट मदत, पीकविमा इत्यादीतून केवळ केवळ ५०० कोटी रूपयांची मदत केली गेली, मात्र, आम्ही अवघ्या ४ वर्षांत २२२६ कोटी रूपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले. हे सरकार खर्‍या अर्थाने गरिबांसाठी, शेतकर्‍यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. मोदींवर टीका करणार्‍यांनी मराठवाड्याचं वाळवंट कुणाच्या काळात झालं, याचं उत्तर दिले पाहिजे. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मोठे काम आता खर्‍या अर्थाने केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतरही अनेक विषयांवर यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले विचार व्यक्त केले.

Previous articleमोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता
Next articleराज ठाकरे यांच्या जाहिर प्रचारसभा कोणासाठी ?