पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा त्यांना शोभणारी नाही
मुंबई नगरी टीम
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हणणे गैर आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल अशाप्रकारे बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. गांधी कुटुंबातले दोन पंतप्रधान या देशात होऊन गेले. दोघांचीही क्रूरपणे हत्या झाली. एवढा मोठा त्याग गांधी कुटुंबाने केला असताना पंतप्रधान मोदी यांची भाषा त्यांना शोभणारी नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार आज साता-यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयावर मते व्यक्त केली. घड्याळाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे मला ईव्हीएम मशीन बाबत चिंता वाटते असे शरद पवार यांनी सांगितले. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणची काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितले. मी घड्याळासमोरचे बटण दाबले आणि कमळाला मत गेले. हा प्रकार मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असेल असे माझे म्हणणे नाही पण हा सगळा प्रकार आम्ही न्यायालयासमोरही आणला. मात्र आमचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या निवडणुकीत सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या त्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षाही मोठ्या होत्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने आता गांभीर्याने दुष्काळाचा मुद्दा हाताळावा अशी मागणी पवार यांनी केली आहे.दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न सरकारला लक्ष्य करण्याचाही नाही,प्रश्न माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून झाली आहे. संकटसमयी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली नाही तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही असेही पवार म्हणाले.