अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी खा. प्रितमताई धावल्या
मुंबई नगरी टीम
परळी : परळी तालुक्यातील लिंबोटा व सरफराजपुर येथे सलग दुसऱ्या दिवशी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करण्यासाठी निघालेल्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी लताबाई भोसले या दुखापतग्रस्त महिलेला वेळीच मदतीचा हात पुढे केल्याने या दुखापतग्रस्त महिलेला वेळेत उपचार मिळू शकले.
लिंबोटा येथील श्रमदान आटोपुन सिरसाळामार्गे सरफराजपूरकडे श्रमदानानिमित्त जात असताना पांगरीपासून काही अंतरावर लताबाई प्रकाश भोसले या दुखापतग्रस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या निदर्शनास आले. जखमी महिलेला पाहताक्षणी प्रितमताईंनी तात्काळ गाडी थांबवून दुखापतग्रस्त महिलेकडे धाव घेतली. जखमी महिलेला स्वतःहुन पाणी पाजवत ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश खा.प्रितमताई मुंडे यांनी सोबत असलेले रवी कांदे व अजय गित्ते यांना केले मुंडे यांच्या संवेदनशीलपणामुळे जखमी महिला लताबाई भोसले यांना पांगरी येथील माउली क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लोकसहभागातून जेंव्हा कामे होतात तेंव्हा त्या कामाचे मौल खऱ्या अर्थाने समजू लागते. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने सर्व एकत्र येऊन दुष्काळाशी दोन हात करत आहेत. दुष्काळमुक्तीच्या या लढ्यात तुमच्या लेकी कायम तुमच्या सोबत असल्याची भावना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.परळी तालुक्यातील लिंबोटा व सरफराजपुर येथे सलग दुसऱ्या दिवशी वॉटर कप स्पर्धेत खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी श्रमदान केले. सरफराजपूर येथील ग्रामस्थांना संबोधित करत असताना खा.प्रितमताई बोलत होत्या.
दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रशासन जरी उपाययोजना करीत असले तरी लोकसहभागा शिवाय दुष्काळ निवारणे अशक्य आहे. दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात सर्वांची एकजूट उत्साहवर्धक असल्याचे प्रितमताईंनी म्हंटले.वॉटर कप स्पर्धेत वाढता लोकसहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नवा आदर्श निर्माण करणारा असून महिलांसह तरुण व आबालवृद्धांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले. आपला शिवार आणि जिल्हा दुष्काळ मुक्त व पाणीदार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन व जलसंधारणाची कामे लोकसहभागातुन व्हावीत अशी भावना प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.
वॉटर कप स्पर्धेनिमित्त सरफराजपूर या अतिशय डोंगराळ भागात असलेल्या गावात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सहभागी होऊन श्रमदान केले . दुर्गम भागात असलेल्या सरफराजपूरच्या डोंगरात येऊन श्रमदान केल्याने ग्रामस्थ भारावून गेले होते . श्रमदानानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या शिदोरीची न्याहारी खा.प्रितमताई मुंडे यांनी केली. यावेळी महिलांनी खा.प्रितमताईंना आपुलकीने घास भरवले. महिला भगिणींनी दिलेल्या आपुलकीमुळे अविस्मरणीय प्रेमाची अनुभूती मिळाल्याची भावना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.