पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करा 

पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करा 

मुंबई नगरी टीम 

मुंबई : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे बारा लाख शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतक-यांना पैशांची आवश्यकता असून पात्र विमा धारक शेतक-यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या बाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्यासह आदींकडे याबाबत त्यांनी लेखी मागणी केली आहे.सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. खरीप २०१८ च्या हंगामाकरीता बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम भरणा केलेली आहे. सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचा विमा बँकेकडे वर्ग झालेला आहे. मात्र शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.बीड जिल्ह्यात सुमारे बारा लाख शेतकर्यांनी सोयाबीनसाठी विमा हप्ता भरला होता. या पात्र विमा धारक शेतक-यांना सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपये पिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांची संपुर्ण पिके वाया गेलेली असतानाही शासन आणि संबंधित विभागाचे मंत्री या बाबत बोलत नाहीत. पिक विमा कंपन्यांकडून सातत्याने नफेखोरी केली जात असल्याची टिकाही वेळोवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली आहे

पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकर्यांकडे पैसा नाही, शेतक-यांना सध्या पैशांची नितांत आवश्यकता आहे. शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत किमान ज्या शेतक-यांनी विम्याचा हप्ता भरला आहे अशा पात्र शेतक-यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे अशी आग्रही भुमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पुढील सात दिवसांत सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शेतकर्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे उद्या  २२ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.  या भागात सध्या पाणीटंचाईच्या मोठ्या समस्येला जनतेला तोंड द्यावे लागत आहे.मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे बहुतांश धरणे ही शहापूर तालुक्यात आहेत. मात्र या धरणातून शहापूर तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत त्यामुळे या भागातील जनतेला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असून जनतेत मोठ्या प्रमाणावर उद्रेक निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे उद्या या भागाचा दौरा करणार आहेत.  एका दिवसात ते तब्बल १३ गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची संवाद साधणार आहेत . या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग वरोरा हे ही त्यांच्यासोबत असणार आहेत. या दौ-यात ते पेठेचा पाडा, आंब्याचा पाडा, ठेंगनमाळ,  तेलमपाडा, पाटोळपाडा,  ढाकणे,  धुपारवाडी, रोड वडाळ, जाम्भूळ पाडा, बाबरेवाडी, पोकळवाडी, जळकेवाडी, कोठारे या १३ गावांना भेटी देणार असून सकाळी ११ वाजल्या पासून या दौ-यास सुरुवात होणार आहे.

Previous articleपालघर आणि भिवंडीमध्ये होणार सर्वाधिक ३५ फेऱ्या
Next articleधनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजाताई मुंडे