भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु
मुंबई नगरी टीम
मुंबई : कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरु असून भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा राजरोस गैरवापर सुरु आहे. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश व बिहार या राज्यांमध्येदेखील हीच निती वापरून भाजपने सत्ता मिळवली. आता पश्चिम बंगाल व कर्नाटक मध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे.
केंद्र सरकारबरोबरच कर्नाटक सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रमुख मंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी कर्नाटक सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त आहेत. भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून व पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत असणा-या पक्षाकडून पैशीची अमिषे दाखवून आणि सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला जात आहे. ही लोकशाहीची विटंबना असून अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे असे चव्हाण म्हणाले.