दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईच्या डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन अधिकार्यांना दंडीत करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
डोंगरी भागात रिपेअर बोर्डाची इमारत कोसळून १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोकं जखमी आहेत ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे असा आरोपही मलिक यांनी केला.अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती.धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन का करण्यात आले नाही असा सवाल मलिक यांनी केला आहे.रिपेअर बोर्डाला लोकं सेस देत आहेत. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांची आहे. तरीही ही घटना घडते म्हणजे रिपेअर बोर्डाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. त्यांच्यावर कुणाचा वचक नाही असा आरोपही मलिक यांनी केला.
मुंबईत वारंवार अशा घटना घडत आहेत. कधी आगीमध्ये लोकांचा जीव जातोय तर कधी पुल कोसळून लोकं मरत आहेत. तर काही ठिकाणी बुडून लोकं मरत आहे.या प्रकरणात कुणावर जबाबदारी निश्चित होत नाही त्यामुळे या दुर्घटना थांबत नाहीत असेही मलिक म्हणाले. जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही अधिकार्यांना दंड होत नाही आणि कुणीही जबाबदारीने काम करणार नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत असेही नवाब यांनी सांगितले.