भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोनभद्रमध्ये पोलीसांनी केलेली अटक निषेधार्ह असून भाजप सरकारने कितीही दडपशाही केली तरी त्यापुढे प्रियंका गांधी झुकणार नाहीत. भाजपाच्या या दंडेलशाहीविरोधातील लढा यापुढेही सुरुच राहील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

प्रियंका गांधी यांच्या अटकेवर संताप व्यक्त करुन वडेट्टीवार म्हणाले की, सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी प्रियंका गांधी जात असताना अटक करणे हे दडपशाहीचेच लक्षण आहे. पीडित लोकांना भेटण्यास आडकाठी करून भाजप सरकार काय साध्य करु इच्छित आहे? पीडितांना भेटणे काही गुन्हा आहे का? असे प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.

भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आज प्रियंका गांधी सोनभ्रद येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारच्या आदेशाशिवाय अशी अटक होऊच शकत नाही. प्रियंका गांधी या देशाला कणखर नेतृत्व दिलेल्या इंदिरा गांधी यांच्या नात आहेत.इंदिराजींनाही जनता पक्षाच्या राजवटीत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत. सरकारविरोधात संघर्ष करुन त्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली, तोच वारसा प्रियंका यांच्याकडे आहे. भाजप सरकारने अडवणूक केली, प्रशासनाच्याआडून दडपशाही केली तरी अशा कोणत्याही दडपशाहीला त्या भीक घालणार नाहीत आणि डगमगणारही नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुवव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. सरकारचे हे अपयश उघडे पडू नये म्हणूनच प्रियंका गांधी यांना अटक करण्यातपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे.अशा कोणत्याही दडपशाहीला भिक न घालता काँग्रेसचा अन्यायाविरोधातील लढा यापुठेही सुरुच राहील, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

Previous articleखूशखबर : कोकणातील गणपती उत्सवासाठी २ हजार २०० जादा बसेस सोडणार
Next articleभंडारा येथे धानाच्या तणसापासून  इथेनॉल आणि सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प