सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील ४ लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या १५ नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना होत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.

स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे २३ तसेच नौदलाच्या २६, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये  व कोल्हापुरात ९ पथके, सैन्यदलाचे ८ पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये २ तर कोल्हापुरात १ अशी तीन पथके कार्यरत असून याशिवाय विशाखापट्टणमचे १५ नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये (जि. कोल्हापूर) दुपारी पोहोचत आहेत.आतापर्यंत कोल्हापूर येथील २ लाख ३३ हजार १५० तर सांगली येथील १ लाख ४४ हजार ९८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७४ बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात ९३ बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे.नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७ तर सांगली जिल्ह्यात ११७ तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४३ हजार 922 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

 बाधित गावे व कुटुंबे

कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-249, बाधित कुटुंबे-48 हजार 588 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-१०८ व कुटुंबसंख्या-२८ हजार ५३७ अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदतीसंदर्भात संपर्कात आहे.मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.

 राज्यातील इतर बाधित गावे

सातारा-११८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-९२२१), ठाणे- २५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-१३१०४), पुणे- १०८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-१३५००), नाशिक-५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-३८९४), पालघर-५८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-२०००), रत्नागिरी- १२ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-६८७), रायगड-६० गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-३०००), सिंधुदुर्ग-१८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-४९०). असे एकूण कोल्हापूर शहरासह ६९ बाधित तालुके तर ७६१ गावे आहेत.

Previous articleपूरग्रस्तांचे मदत कार्य सुरळीत होण्यासाठी  जिल्ह्यात बंदीचे आदेश           
Next articleकोल्हापूर -सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी भाजपा सरसावले