लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तब्बल २१ लाख मतदार वाढले

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तब्बल २१ लाख मतदार वाढले

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ ऑगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट  या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.

मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ४ कोटी ५७ लाख २ हजार ५७९ पुरुष मतदार व ४ कोटी १६ लाख २५ हजार ८१९ महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ३१ ऑगस्ट  रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख ३५ हजार २६२ नव्या पुरुष मतदारांची वाढ होवून ती ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये १० लाख ७९ हजार ९५८ एवढी वाढ होऊन ती आता ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी २ हजार ८६ तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये ५०७ मतदार वाढून ते आता २ हजार ५९३ एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे.

Previous articleविरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर
Next articleशरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही