महायुतीची घोषणा ; बंडाळी टाळण्यासाठी जागा वाटप गुलदस्त्यात
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना, भाजप, रिपाई,रासप,शिवसंग्राम,रयतक्रांती यांच्या महायुतीची घोषणा आज अखेर करण्यात आली. एका संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.मात्र आज महायुतीची घोषणा करण्यात आली असली तरी शिवसेना भाजपातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला नसल्याने जागा वाटपाचा संभ्रम कायम आहे. शिवसेना आणि भाजपातील इच्छूकांची संख्या पाहता बंडाळी टाळण्यासाठी मतदार संघ निहाय जागा वाटप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महायुतीची घोषणा केली. आज सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र या पत्रकामध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा तसेच महायुतीतील रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.राज्यात गेली ५ वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत.या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार, इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत असे नमुद करण्यात आले आहे.