काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पदयात्रा व चौक सभांवर भर

काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पदयात्रा व चौक सभांवर भर

मुंबई नगरी टीम

मुंबई : चांदिवली मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार आरीफ मोहमद नसीम खान यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पदयात्रा व चौकसभांवर त्यांनी भर दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी काढलेल्या पदयात्रेतही लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच पुन्हा निवडून येऊ, असा विश्वास यावेळी नसीम खान यांनी व्यक्त केला.

चांदिवली मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराची जुमलेबाजी कामाला येणार नसून २० वर्षांपासून आमदार तसेच मंत्री असताना या मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. एअर कंडीशन ऑफीसमध्ये बसून फक्त निवडणुकीच्यावेळी जनतेकडे मते मागणाऱ्या उमेदवारासारखे आपले काम नसून ऊन, वारा, पावसातही जनतेच्या कामासाठी हजर असतो. सुख-दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आलो आहे. माझे काम हीच माझी ओळख असून जनतेचा मोठा पाठिंबा व आशिर्वाद असल्याने पुन्हा विजयी होऊ, असे नसीम खान म्हणाले.

विरोधी पक्ष माझ्याविरोधात कट-कारस्थान करुन अपप्रचार करत आहेत परंतु त्यांना याकामी यश येणार नाही. आपल्याविरोधात कितीही खोटा प्रचार केला तरी लोक अशा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. विरोधकांच्या या अपप्रचाराला २१ तारखेला जनताच उत्तर देईल, असेही नसीम खान म्हणाले.    पदयात्रेदरम्यान जंगलेश्वर मंदीर, दत्तनगर, नागौरी चाळ आणि संघर्ष नगर येथे चौक सभा घेतल्या. यावेळी त्यांनी भाजप शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. भाजप सरकार देशातील स्वायत्त संस्था मोडीत काढायला निघाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधानही धोक्यात आहे. देशातील सामाजिक सलोखा नष्ट करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, सर्व समाजाच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीलाच मतदान करा, असे आवाहन नसीम खान यांनी यावेळी केले.

Previous articleभाजपाच्या चार बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
Next article४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी