आघाडी सरकारचा पैसा दलालांच्या खिशात तर महायुतीच्या सरकारचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यात
मुंबई नगरी टीम
यवतमाळ : महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपये दिले. ते आम्हाला दिसतच नाहीत, असे शरद पवार म्हणतात. पण पवार साहेब, तुमच्या काळात पैसा जो निघायचा तो दिसायचाच नाही. तुमच्याच दलालांच्या खिशामध्ये तो जायचा. आमच्या काळात दलालच नाहीत. मुंबईतून जो पैसा निघतो तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जातो. आम्ही ५३ हजार कोटी रुपये कुठे दिले त्याचा हिशेब आम्ही दिला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या आरोपांना आज उत्तर दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदारसंघातील उमेदवार डॉ. संदीप धुर्वे आणि पुसद मतदारसंघातील उमेदवार निलय नाईक यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या आरोपांचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, महायुतीसमोर समोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे हताश पक्ष आहेत. राहुल गांधी बँकॉकमध्ये होते. राहुल गांधीना पक्क माहिती आहे, मागच्या वेळी ४२ आमदार निवडून आले होते. आता २४ ही आमदार निवडून येणार नाहीत. म्हणून ते महाराष्ट्रात येत नव्हते. सलमान खुर्शीद म्हणाले होते, लढण्याची वेळ येते तेव्हा आमचे नेते पळून जातात. राहुल गांधींनाही लक्षातच आले नाही. ते म्हणाले, पिछले ७० सालों से कुछ मिला नही. खरे आहे. लोकसभा निवडणूक संपली ही विधानसभा निवडणूक आहे. पण त्यांच्या भाषणाची जुनीच कॅसेट वाजते आहे. राहुल गांधींच्या सभा वाढल्या की आमची मते वाढतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले, देशातली सर्वात मोठी कर्जमाफी सरकारने केली. आर्णी, केळापूर, घाटंजी तालुक्यांमध्ये ४८ हजार शेतकऱ्यांना ३०५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. यवतमाळ जिल्ह्यात ११०० कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने संपूर्ण विदर्भाला जेवढे पैसे दिले, तेवढे पैसे आम्ही एकट्या यवतमाळ जिल्ह्याला दिले.महायुतीच्या सरकारने केळापूर प्रकल्पाला ९२ कोटी रुपये दिले. चनाखा उपसा सिंचनासाठी ३६८ कोटी रुपये दिले. ५४ किमीच्या वाघाडी नदीच्या अनोख्या पुनरुज्जीवन प्रकल्पाकरता केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून ९०० कोटी दिले. त्यामुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महायुतीच्या सरकारने बंजारा समाजाचे आराध्य दैवत पोहरा देवी तीर्थस्थानाचा १०० कोटींचा आराखडा तयार केला. तेथील काम पूर्ण झाल्यानंतर उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले आहे. टिपेश्वर अभयारण्याकरता ५० कोटी, म्हसोला कान्होला मंदिर, बोरगाव श्रीराम मंदिर आर्णीबाबा कंबलपोस्ट दर्गा, पिंपळनेर आप्पास्वामी मंदिर आदी तीर्थस्थानांच्या विकासाकरता निधी दिला. जगदंबा संस्थानाकरता पाच कोटी रुपये भक्त निवासाकरता दिले असेही मुख्यमंत्री म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यातील बंद पडलेले प्रकल्प महायुतीच्या सरकारने सुरू केले. यवतमाळ जिल्ह्यातील १४ प्रकल्पांना ४५० कोटी रुपये केंद्र-राज्य सरकारांनी दिले. या पैकी १० प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करू. ३ प्रकल्पांचे काम डिसेंबरपर्यत संपवू. सरकारने जिल्ह्यातील कृषीपंपांचा बॅकलॉग संपवला. २०२४ पर्यंत प्रत्येक घरांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत पोचविण्याचे स्वप्न मोदीजींनी आम्हाला दिले आहे. ते आम्ही पूर्ण करू. माळपठारावर पिण्याचे पाणी पोचवू. प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोचवू. असे पुसदच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.