राष्ट्रवादीची अवस्था २०१४ पेक्षाही बिकट होईल !
मुंबई नगरी टीम
काटोल : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत चुरसच नाही. लोकसभेत राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे १२ वाजले. नॅनो गाडीत बसतील एवढेच त्यांचे खासदार निवडून आले. विधानसभेत त्यांचे ४१ आमदार होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत १४ आमदार तरी निवडून येतील का ? राष्ट्रवादीची अवस्था २०१४ पेक्षाही बिकट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल, कन्हान, तुमसर येथील प्रचार सभांमध्ये सांगितले. लढायची वेळ येते तेव्हा काँग्रेसचे नेते पळून जातात, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
चरणसिंग ठाकूर, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रदीप पडोळे या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेमके कोणाकरता सभा घेतात? तेच म्हणतात, जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. जनतेवर अन्याय झाला. ते विसरले ७० वर्षांतले ६० वर्ष त्यांच्याच परिवाराचे देशावर राज्य होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या सरकारपेक्षा महायुतीच्या ५ वर्षांच्या सरकारने दुपटीपेक्षा जास्त काम केले. महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा किमान अडीच पटींनी आमचे काम मोठे होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी जलयुक्त शिवारची कामे झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पाणी नव्हते म्हणून काटोल ड्रायझोन राहिला. पण आता महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. पुढच्या तीन वर्षांत मतदारसंघ ड्रायझोनमधून बाहेर आणू. एक मंत्री काय करू शकतो, हे बावनकुळेंनी दाखवले. ते आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोठे झालेले दिसतील.
अनिल देशमुखांनी मंत्री झाल्यावर केलेली एकतरी गोष्ट दाखवा, असे आव्हान देऊन मुख्यमंत्री म्हणाले, अनिलबाबूंनंतर आशिशबाबू आले. ते माझ्या विरोधात लढत आहेत. त्यांचे पार्सल पॅक करून पाठवतो. जनतेकरता राजीनामा देतोय म्हणून सांगायचे आणि पळपुटे करायचा, ही त्यांची कामे आहेत. काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांना आमदार बनवण्याची औपचारिकता पूर्ण करायची आहे. आमदार होण्यापूर्वीच चरणसिंग ठाकूर यांनी भरपूर कामे केली आहेत. काटोलचा वनवास संपणार आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वांत चांगला मतदारसंघ काटोल तयार करू.’ जिल्ह्यातील सर्व १२ जागा निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. पालकमंत्री म्हणून नितीन गडकरी आणि बावनकुळे यांच्याएवढे काम नागपूरसाठी कोणीही केलेले नाही, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, कितीतरी वर्षे आपल्या जमिनी वर्ग दोनच्या होत्या. आम्ही भूमीधारी होतो. भूमीस्वामी नव्हतो. पण महायुतीच्या सरकारने भूमीधारींना भूमीस्वामी केले. सर्व जमिनी वर्ग १ च्या केल्या. लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. गोसीखुर्द झाल्यानंतर ही भूमी सुजलाम सुफलाम होईल. महायुती सरकारने मागेल त्याला वीज कनेक्शन देऊन विदर्भाचा बॅकलॉग ५ वर्षांत संपवला. बंडखोरांना आमचा आशीर्वाद नाही. ज्याच्याजवळ कमळ नाही त्याला आशीर्वाद नाही. ज्याच्याजवळ कमळ आहे, त्यांनाच आमचा आशीर्वाद असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.