भाजप शिवसेनेच्या सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही

भाजप शिवसेनेच्या सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई  :  विधानसभा निवडणुकीत भाजप  शिवसेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नसल्याचे दिसले आहे. मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु युतीने सीमा ओलांडली होती अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

भाजपने २२० जागा पार करू म्हटले होते मात्र राज्यातील जनतेने ते स्वीकारलेले नाही हे निकालावरून स्पष्ट झाले असल्याचा टोला त्यांनी भाजपाला लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारला आहे तो आम्ही स्वीकारतो आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले. राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे शरद पवार यांनी आभार मानले.या निवडणूकीत पक्षांतर करणा-यांना राज्यातील जनतेने स्वीकारले नसल्याचे पुढे आले आहे. जनतेने त्यांच्याविरोधी भूमिका घेतली. सातारा लोकसभा पोटनिवडणूकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर होता परंतु त्या गादीशी इमान ठेवले नाही तर काय होते हे लोकांनी दाखवून दिले असा टोला लगावत साता-यातील जनतेने आमचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना जनतेने चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल सातारकरांचे आभार मानतो. परंतु मी तिथे जावून सातारकर जनतेचे आभार मानणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

उद्यापासून संसदेचे दिवाळी सुरु होत आहे.त्यामुळे दिवाळीनंतर राष्ट्रवादी पक्षाची बैठक होईल.त्यानंतर मित्रपक्षांसोबत एकत्रित बैठक होईल. एकंदरीत जनमत पहाता पक्ष उभारणीची काळजी घेऊन,नव्या पिढीला बरोबर घेऊन तो अजुन व्यापक करणार आहे. राज्यपातळीवर ठिकठिकाणी जावून प्रयत्न करणार आहे असेही  पवार म्हणाले.आम्ही आमचा पक्ष मित्रपक्ष यांना घेवून काम करणार आहोत. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवले आहे. आम्ही त्याचा स्वीकार करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनी निवडणूकीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे दर्शन घेतले त्याबद्दल त्यांना  धन्यवाद देतो असा टोला लगावत आघाडीचा धर्म कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाळला आहे असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले

Previous articleआदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनु शकतात !
Next articleफडणवीस सरकारमधिल आठ मंत्र्यांचा पराभव