सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवा : शरद पवार
मुंबई नगरी टीम
नाशिक : शिवसेना भाजपातील सत्तेचा पेच कायम असतानाच काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते.भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेला फटकारले आहे. भाजप शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला त्यांनी या दोन्ही पक्षांना लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याभेटीच्या माध्यामातुन शिवसेनेने भाजपावर दबावतंत्र अवलंबल्याची चर्चा होती.राज्यात युतीला जनतेने कौल दिला असतानाही सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याने राज्यात राजकीय पेच कायम असतानाच आता यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यानी सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशीही काल झालेल्या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही, भाजपा आणि शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला त्यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे.