मुख्यमंत्री शिवसेनेचाच; शिवतिर्थावर शपथविधी : संजय राऊत
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपा शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असतानाही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमच्याकडे १७५ आमदारांचे संख्याबळ असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगतानाच,राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि त्यांचा शपथविधी हा शिवतिर्थावर होईल, असा दावा केला असल्याने युतीमधिल तणाव वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसाचा कालावधी उलटूनही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपातील सत्ता स्थापनेचे घोडे अडले आहे.भाजपावर दबावतंत्र अवलंबिण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी धरूनही भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चालला आहे. राज्यातील राजकारणात हस्तक्षेप करणारे दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांनी याकडे कानाडोळा केल्याने युतीतील धुसफुस वाढली आहे.त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत घेवून एकच खळबळ उडवून दिली आहे.अपक्ष आमदारांसह शिवसेनेला पाठिंबा देणा-यांची संख्या वाढतच असून,काल शिवसेनेकडे असणारे १७० चे संख्याबळ आता १७५ वर गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा अशी इच्छा राज्यातील जनतेची आहे.मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून, त्यांचा शपथविधी हा शिवतिर्थावर होईल असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्ता स्थापनेच्या अंतिम निर्णयापर्यंत आले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.