अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात शिवसेना भाजपाला जनतेने कौल देवूनही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षात एकमत होवू न शकल्याने भाजपाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली तर शिवसेनेने आवश्यक संख्याबळाचे पत्र राज्यपालांना सादर न केल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी पक्षाकडे सरकार स्थापनेची विचारणा करूनही राष्ट्रवादीने दावा न केल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर  या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात सुरू असणारा सत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपा आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसंदर्भात विचारणा केली होती.मात्र राष्ट्रवादीला दिलेल्या मुदतीपूर्वीच राष्ट्रवादीने आवश्यक संख्याबळ नसल्याचे सांगितल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केल्यानंतर दिल्लीत केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.आज सकाळपासूनच राज्यात राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर शिवसेनेने  आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेनेची बाजू  ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार आहेत. शिवसेनेचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी ही माहिती दिली.शिवसेनेच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.

राज्याच्या राजकीय इतिहासात यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागली करण्यात आली होती.त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. या पूर्वी १९७८ आणि २०१४ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार होते. त्यावेळी पुलोदचे सरकार बरखास्त करून  विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्याने १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले होते. २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.त्यावेळी राज्यात 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट होती.

Previous articleपाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेना “वेटिंगवर”
Next articleशिवसेना राष्ट्रवादीचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री