सरकार स्थापनेच्या दिशेने शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे पाऊल
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर आणि उपाय योजनांवर विचार विनिमय करण्यात आला.या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला आहे. या किमान समान कार्यक्रमावर या पक्षांचे अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील त्यानंतर पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल.
राज्यात सर्वात जास्त जागा मिळालेल्या भाजपाला वगळून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे नवे समीकरण उदयास येत आहे. गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर या पक्षांच्या समन्वय समितीने किमान समान कार्यक्रमावर मोहर उठविल्याने राज्यात या तिन्ही पक्षाचे सरकार स्थापन करण्याच्या दिशेन महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला. आजच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येवून मसुदा तयार करण्यात आला आहे. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना दिला जाणार जावून त्यावर निर्णय घेतला जाईल.त्यामुळे राज्यात लवकरच सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.