पाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले: छगन भुजबळ

पाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले: छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आल्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे थांबवण्याची सरकारवर नामुष्की आल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे संस्थगित करण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी तसे लेखी पत्र मेल करून राज्यातील मुख्य अभियंत्यांना आदेश दिले आहे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

राज्यातील नागरिक रस्त्यांच्या प्रश्नांमुळे प्रचंड हवालदिल झालेले आहेत.रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.राज्यभरात अनेक रस्त्यांमध्ये खड्डे मावत नाहीत. वाहनचालकांना वाहने चालवतांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. असे असताना अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे थांबवण्याची नामुष्की आज राज्यावर ओढवली आहे. हाती घेण्यात आलेल्या कामांची संख्या आणि निधी उपलब्धतेचे प्रमाण यामध्ये प्रचंड विषमता असल्यामुळे अर्थसंकल्पीय पुस्तकामध्ये दर्शविलेले परंतु अद्याप कार्यरंभ आदेश न दिलेली कामे संस्थगित करण्यात यावी असे आदेश काल १४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना दिले आहे.ही बाब अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे.राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे गेल्याचे वेगळे सांगण्याची गरजच नाही हे यावरून स्पष्ट झाल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Previous articleसरकार स्थापनेच्या दिशेने शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे पाऊल
Next articleराज्यातील नवे सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार