२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना संख्याबळाची आकडेवारी दिली होती का ?

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना संख्याबळाची आकडेवारी दिली होती का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेकडे आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे नसल्याने सरकार स्थापन करता आले नाही.मात्र २०१४ मध्ये जेव्हा भाजपाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला तेव्हा देवेद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नसल्याची कबुली खुद्द राज्यपालांच्या कार्यालयाने दिल्याची बाब समोर आली आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात वाद झाल्याने सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसंदर्भात विचारणा केली.भाजपाने अपु-या संख्याबळा अभावी सरकार स्थापन्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली.शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार अशी चर्चा असताना दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रे न दिल्याने त्यांनी केवळ शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र दिले. मात्र पाठिंब्यांची पत्रे देण्यास राज्यपालांनी शिवसेनेला दोन दिवसाचा अवधी न दिल्याने शिवसेना सरकार स्थापन करू शकले नाहीत.मात्र २०१४ साली सरकार स्थापन करताना भाजपाने पाठिंबा देणा-या आमदारांची कोणतेही पत्र राज्यपालांना सादर केली नसल्याची बाब माहिती अधिकारात पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल कार्यालयाकडे याबाबतची माहिती माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती.

२०१४ साली सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यावेळी एकनाथ खडसे-पाटील,विनोद तावडे,सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे-पालवे या भाजपा कोअर कमिटी सदस्याचे हस्ताक्षर असलेल्या पत्राची प्रत दिली. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना कळविण्यात आले की भारतीय जनता पार्टी ही या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने  आपण आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असे या पत्रात नमुद करण्यात आले होते. त्यानंतर विधानमंडळात भाजपाने आवाजी मतदानाने विश्वास ठराव जिंकला होता.त्यावेळी फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नसल्याची कबुली राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना  माहितीत दिली होती. गलगली यांनी महाराष्ट्राचे राज्यपालांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी किती संख्याबळाचे समर्थन असल्याचे पत्र दिले, त्या पत्राची प्रत देण्याची मागणी केली होती. राज्यपालाच्या अवर सचिव(प्रशासन) व जन माहिती अधिकारी उज्वला दांडेकर यांनी दिनांक २८.१०.२०१४ रोजी  प्राप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची प्रत दिली आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करताना संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नसल्याचे म्हटले आहे.

Previous articleकाँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व मुद्द्यांवर एकमत
Next articleनव्या सरकारमध्ये यांना मंत्री म्हणून मिळू शकते संधी !