पुर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईतील पुर्व द्रुतगती मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला केली.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त,परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या.दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच पुर्व द्रुतगती मार्गाच्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन या मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.