जनसेवेसाठी नाही, तर डल्ला मारण्यासाठी हे सरकार सत्तेत!
मुंबई नगरी टीम
नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार हे जनसेवेसाठी नाही तर डल्ला मारण्यासाठी सत्तेवर आले आहे. आम्ही नुकतीच शपथ घेतली, अजून आमचे खिसे गरम व्हायचे आहेत, असे स्वतः मंत्री जाहीर सभांमधून सांगत आहेत. जे मनात होतं, तेच आता शब्दांमधून बाहेर पडू लागले आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील प्रचार सभांमधून केला.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा आजचा पाचवा दिवस देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील खैरगाव येथून सुरू केला. आज दिवसभरात एकूण ८ सभा आहेत. ते म्हणाले की, भरपूर अटींची कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा मदत नाही, अशी अन्यायाची मालिकाच आता सुरू झाली आहे.१० रुपयात जेवण देण्याची योजना प्रचंड गाजावाजा करून सुरू केली. पण १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार लोकांना त्याचा लाभ होणार आहे, तो सुद्धा प्रचंड अटींवर आधारित आहे. खूप मोठ्या घोषणा आणि प्रत्यक्षात काहीच नाही, अशी या सरकारची स्थिती आहे. ५९ लाख लोकसंख्या असलेल्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात तर केवळ ७०० लोक या योजनेचे लाभार्थी ठरतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे. प्रत्येक सभांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. गेल्या ५ वर्षात अनेक कामे आपल्या सरकारने केली. मोदींच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना आजही पारदर्शीपणे राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, घराघरात शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, वीज, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम झाले. राज्य सरकारने कर्जमाफी दिली, शेतकऱ्यांना थेट मदत, शेतीपंपाला वीज, ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना, पाणंद रस्ते, निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ, बचतगटांना कर्ज असे मूलभूत काम गेल्या काळात झाले, असेही ते म्हणाले.