मुंबई नगरी टीम
मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देऊनही महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने फुसली.त्याचा सरकारला जाब विचारण्यासाठी सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला,परंतु आम्हाला बोलू दिले नाही आणि प्रस्तावही मांडू दिला नाही. हा प्रकार म्हणजे विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे.विरोधी पक्षाला देण्यात येणारी वागणूक सूड भावनेतून देण्यात येत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याची जोरदार टीका विधानपरषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात हेक्टरी २५ हजार कोरडवाहूसाठी तसेच ,५० हजार हेक्टली बागायती शेतीसाठी देण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, या वचनाला हरताळ फासली गेला आहे, असा आरोप करताना प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात महिलांवर खुलेआम अत्याचार होत आहेत. महिलांना दिवसाढवळ्या रॉकेल ओतून जाळण्याचा प्रकार घडतोय. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न नियम २८९ अन्वये मांडण्यात द्यावेत, तसेच अन्य कामकाज थांबवून या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा करावी अशी विनंती सभापतींकडे विरोधी पक्षांनी केली. मात्र, सभापतींनी विरोधी पक्षाला संविधानाने जे अधिकार दिले आहेत त्यालाच अमान्य केले असल्याची टिकाही दरेकर केली.
शेतकरी आणि महिलांचे प्रश्न, त्यांची भूमिका सरकारसमोर मांडायची होती म्हणून सभापतींकडे ओरडून विनंती केली. मात्र विरोधी पक्ष नेत्यांचा माईकच बंद करण्यात आला. महाराष्ट्रातील शेतकरी आज सरकारकडून आशा लावून बसला आहे. राज्यातील महिला भयभीत आहेत. महिलांसोबत रोज अत्याचाराचे प्रकार घडत आहेत. हिंगणघाटच्या दुर्दैवी प्रकारा नंतर लासलगाव ची महिला मृत्युमुखी पडली आहे, असे असताना सरकार अजून किती बळी असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्याच्या कोट्यवाधी जनेतच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही हे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी सभापतींकडे वारंवार विनंती केली, परंतु सभापतींनी आमच्या विनंतीकडे कानाडोळा केला. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका ही लोकांचे प्रतिबिंब असते. पण विरोधकांचा माईक बंद पाडणे, विरोधकांना बोलू न देणे असा प्रकार विधिमंडळात होत आहे. म्हणूनच सभागृहातील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारच्या या मुस्कटदाबीचा निषेध करीत सभागृहात घोषणा दिल्या आणि सरकारच्या या मुस्कटदाबीचा निषेध केल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.