महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका

मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात आणि महाराष्ट्रात एकही संशयीत रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.आरोग्य विभागामार्फत यासंबंधी विविध माध्यमांतून जाणीवजागृती करण्यात येत असून समाजमाध्यमांवर कोरोनासंबंधी फिरणारे संदेश,अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

यासंबंधी सदस्य संजय पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यासंदर्भात सविस्तर माहिती देतांना ते म्हणाले की, या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ हे नाव दिलेले आहे. कोरोनाचा संसर्ग मांसाहार केल्याने होत नाही. यासंबंधी समाजमाध्यमांवर जे संदेश फिरत आहेत. ते चुकीचे असून पशुपालन आयुक्तांमार्फत सायबर गुन्हे शाखेकडे त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्णपणे खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळावर चीनसह १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी कशापद्धतीने केली जाते हे पाहण्याकरिता लवकरच विमानतळाला भेट देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेएनपीटी तसेच अन्य बंदरांवर देखील तपासणी केली जात आहे. सध्या या आजारावर लक्षणानुसार उपचार पद्धत अवलंबली जात आहे.खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक विलगीकरण स्थापन करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी वापरला जाणारा एन-९५ मास्कची राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्धता आहेत. ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स अंतर्गत चार महत्वाच्या डॉक्टरांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यभर पोस्टर्स, रेडीओ, दूरचित्रवाहिन्यांमार्फत जाणीवजागृती केली जात आहे. पुणे येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.चीन किंवा बाधीत देशांमध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असलेले नागरिक अडकले असतील त्यांना केंद्र शासनाच्या मदतीने देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleएकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही
Next articleमाथाडी कामगारांच्या पैशाचा अपहार करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई