“शिमगा संपला आता नवीन मुहूर्त शोधा” शरद पवारांचा भाजपाला टोला

मुंबई नगरी टीम
मुंबई : “शिमगा संपला आता नवीन मुहूर्त शोधा” असा टोला भाजपला लगावत महाराष्ट्रामध्ये सरकारचे काम चांगले चालले असून, हे सरकार पाच वर्ष काम करेल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहेत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मध्यप्रदेशात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. ते योग्य प्रकारे सध्याची परिस्थिती हाताळतील असे सांगतानाच मध्यप्रदेशातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे असेही पवार म्हणाले.मध्यप्रदेशातील घडामोडींचे कसलेही पडसाद राज्यात उमटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले आहेत.याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारला शंभर पैकी किती गुण देणार असा प्रश्न केला असता, राज्यातील ठाकरे सरकारला मी शंभर पैखी शंभर गुण देवू इच्छितो. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे हे योग्य दिशेने कारभार करीत आहेत.ते राज्याला योग्य दिशेने घेवून जात आहेत असेही पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांचीही खिल्ली उडवली. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोसळण्याचे मुहूर्त अनेक जण सांगत आहेत.काहींनी हे सरकार गुढीपाडव्यापर्यंत कोसळेल असे सांगितले आहे. या प्रश्नावर त्यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. शिमगा संपला ना असे उत्तर देवून त्यांनी विरोधकांवर प्रहार केला.या शंभर दिवसाच्या काळात पत्रकारांना काहीही लिहण्याची संधी मिळाली नाही हेच सरकारच्या यशाचे गमक आहे असेही पवार म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे हे एक चांगले युवा नेतृत्व होते. पण त्यांच्या पक्षात काय झाले हे मला माहिती नाही. पण काँग्रेस पक्षात निवडणूक हरलेल्या नेत्याला लगेच काही जबाबदारी दिली जाईल असे होत नसते. तरीही आता असे वाटते की कदाचित शिंदेंच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले असते तर कदाचित स्थिती निराळी झाली असती.पण कमलनाथ यांना मी ओळखतो. राजकीय चमत्कार करण्याची त्यांची क्षमता नक्कीच आहे. मध्यप्रदेश मधिल सरकार कोसळले असे सध्यातरी वाटत नाही असेही ते म्हणाले. येस बँक घोटाळ्याच्या जबाबदारीपासून केंद्रीय अर्थखाते व बँकिंग व्यवहार खाते यांना पळ काढता येणार नाही. हा घोटाळा काही एका दिवसात नक्कीच घडलेला नाही असेही ते म्हणाले. जम्मू व काश्मीरमधील ज्या नेत्यांना स्थानबद्ध केले आहे ते कोणत्या कायद्याखाली करण्यात आले असा सवाल पवार यांनी केंद्र सरकारला केला. या संवेदनशील राज्यातील महत्वाच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे हे अधिकाराचा दुरुपयोग आहे असे.मी, ममता बॅनर्जी, देवेगौडा, यशवंत सिन्हा अशा पाच जणांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले हे असेही पवार म्हणाले.

Previous articleअजित पवारांचा अर्थसंकल्‍प म्‍हणजे खोदा पहाड निकला : सुधीर मुनगंटीवार
Next articleजातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करा