लॉक डाउनच्या काळात दारु विक्री करणा-यांवर एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई

मुंबई नगरी टीम

मुंबई : २४ मार्चपासून कोरोना व्हायरस मुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात पूर्णतः लॉक डाउन करण्यात आला असून, राज्यातील सर्व दारूची  बंद ठेवण्यात आली आहे. मात्र  शहरी तसेच ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेवून अनेक ठिकाणी बेकायदा  दारु, गावठी दारु विक्रीचे प्रकार समोर आले आल्याने आता अशी विक्री करणा-यावर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र राज्यातील शहरी आणि ग्रामिण भागातीत बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली असून, अशी विक्री करणा-यांवर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधित अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध जोरदार कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार गोवा, दादरा – नगर हवेली, दीव – दमण, कर्नाटक व मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत, तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून पूर्ण नाकाबंदी करण्यात आलेली आहे. विभागातील अधिकारीकर्मचारी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध गुन्हा अन्वेषणाची धडक कारवाई करीत आहेत. गेल्या दोन दिवसात राज्यात ९४ वारस, १२१ बेवारस असे एकूण २१५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९४ आरोपीना अटक करण्यात आले आहे व एकूण रु. ४६ लाख ६९ हजार ६९९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वारंवार गुन्हे करणारे व अशा कृत्याच्या पाठीमागे असलेल्या सर्व संबंधीत लोकांवर जरब बसविण्यासाठी अशा लोकांच्या मुसक्या आवळुन दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए. सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

 

Previous articleएका महिन्याचे कर्जांचे हप्ते स्थगित करा : नवाब मलिक यांची मागणी
Next articleशरद पवार आज  फेसबुक पेजवरून जनतेशी संवाद साधणार