मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात आज आणखी २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५३ वर पोहचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूर मधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या ४ सहवासितांचा समावेश आहे. या शिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे. दरम्यान आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृध्देचा कोरोना मुळे मृत्यू झाला. हा राज्यातील करोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे.
आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका ८५ वर्षीय डॉक्टरांचा संशयित करोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खाजगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. राज्यात आज एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३ हजार ४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३ हजार ५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ४५ जण क्वारंटाईन मध्ये आहेत.