मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांची सुरक्षितता या विषयावर राज्यातील महिलांशी संवाद साधला.यावेळी या विषयावर बोलताना त्यांना माजी गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणजेच आबांची आठवण आली.आबांनी कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा सामाजिक प्रश्न पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून एक संवेदनशीलतेने सोडवल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक महिलेला तिला तिचा आधार नको आहे तर तिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. तिला मान द्या, तिचा सन्मान करा, तिचे कौतुक करा, तिच्यावर प्रेम करा, तुम्ही जेवढे प्रेम कराल त्याच्या दसपटीने ती तुमच्यावर प्रेम करेल, असा विश्वास सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला.लॉकडाऊनच्या काळात महिलांसमोर फार मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी समुपदेशनची गरज भासणार आहे आणि त्यातून आपले कुटुंब वाचवू शकतो.कौटुंबिक हिंसाचार यातून थांबेल असे नाही परंतु यातून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न आम्ही करु शकतो. कौटुंबिक हिंसाचार हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे मदत करण्याची, त्यांच्यासोबत उभं राहण्याची ही वेळ आहे म्हणून हा विषय घेतल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.कौटुंबिक हिंसाचारावर मात कशी करायची यावर मी सोलूशन दिलेले नाही परंतु आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही त्यांनी दिला.हा तणावाचा कालावधी आहे. या कालावधीत ज्या प्रतिक्रिया येतात त्यावर प्रत्युत्तर दिले पाहिजे का? महिला नेहमी संवेदनशील असतात. त्यामुळे पुढच्या कालावधीत कौटुंबिक हिंसाचारातून कसा मार्ग काढायचा ज्यातून आपलं घर, कुटुंब, मुलं कशी सुरक्षित राहतील यासाठी तुमच्या व महिलांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत हे सांगण्यासाठी हा संवाद साधल्याचे सुळे यांनी सांगितले.
या विषयावर अनेक दिवस काम करत असल्याचे सांगतानाच पुणे जिल्हा परिषदेने जो अतिशय सुंदर उपक्रम राबवला आहे तो राज्यातही राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचार हा नाहीच हे आपले फायनल डेस्टीनेशन असले पाहिजे असे सांगतानाच आर.आर आबांची आठवण येत असून,त्यांनी कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा सामाजिक प्रश्न पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून एक संवेदनशीलतेने सोडवल्याचे सांगितले. शिवाय आता गृहमंत्री अनिल देशमुख सातत्याने राज्याचे दौरे करून कोरोनावर मात करण्यासाठी तैनात पोलिसांचे मनोधैर्य वाढवत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना कसं सुरक्षित ठेवता येईल असा प्रयत्न रात्रंदिवस करत आहेत. त्यांच्या नातवंडांची गोड पोस्ट पाहिली त्यांचे आजोबा त्यांना भेटत नाहीत. त्याबद्दल त्यांची छोटीशी तक्रार होती हा किस्सा सांगताना शेवटी माणुसकी व कुटुंब हेच महत्वाचे असतं असेही सुळे यांनी सांगितले.
आपले कुटुंब टिकले पाहिजे. आपल्या मुलांसाठी जगलं पाहिजे. एक सुरक्षित व प्रेमळ घर देण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलांचा असतो. तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा खरा प्रयत्न करत असते. तिच्यावर अन्याय होवू नये किंवा करु नका असं सातत्याने पुरुषांनाही समुपदेशन करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचार थांबावा ही सगळी जबाबदारी महिलेची नाही तर पुरुषांची जास्त आहे असेही सुळे यांनी स्पष्ट केले.शिक्षणातून किंवा जे घरात संस्कार होतात ते खूप महत्त्वाचे असतात. नियम व कायदे याची माहिती आणि त्यांचे काय अधिकार आहेत याची माहिती शिक्षणाच्या माध्यमातून मुलं व मुलींना दिली पाहिजे. जे एकत्रित कुटुंब म्हणून राहत आहेत त्यांनी सध्या तणाव खूप आहे. ही अबनॉर्मल परिस्थिती आहे ही नॉर्मल परिस्थिती नाही परंतु या कालावधीत कौटुंबिक हिंसाचार वाढतोय त्याची नोंद एक समाज म्हणून घेतली पाहिजे आणि हा हिंसाचार थांबला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अशी विनंती सुळे यांनी केली आहे.