मुंबई नगरी टीम
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलूनची दुकाने सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. त्यावेळी भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रशाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.