मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा अजित पवारांचा झालेल्या शपथविधीवरून सुरू असणारे राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही.भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही.तर हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप शिवसेनेला युतीला स्पष्ट कौल दिला असतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू ठेवले असतानाच राजभवनावर पहाटे पहाटे झालेला देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शपथविधी राज्यातील राजकारण्यासह जनताही विसरू शकत नाही.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून सहा महिन्यांचा कालावधी झाला असतानाही राष्ट्रवादीने भाजपशी केलेली हात मिळवणी यावरून सुरू असलेले राजकारण थांबता थांबेना. त्यातच आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांना इनसाईडरसाठी दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे.राज्यात युतीचे सरकार असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाच वर्षात एकही शब्द खाली पडू दिला नाही.त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य केली असा दावा फडणवीस यांनी या मुलाखतीत केला आहे.मात्र निकालानंतर त्यांनी माझे फोन घेणे टाळले.मला सत्ता गेल्याचे दु:ख नाही तर त्यांच्या वागण्याचे दु:ख आहे. अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.
राज्याच्या राजकारणात गाजलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीबाबतही त्यांनी या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.भाजपसोबत येण्यास शिवसेनेने नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसाठी होकार मिळाल्याचा दावा फडणवीस यांनी या मुलाखतीत केला आहे.सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्या होत्या.त्यातील एका बैठकीला मी होतो.त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन करण्याचे ठरले होते. भाजप सोबत जायचे हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नव्हता तर हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी या मुलाखतीत केला आहे.फडणवीसांनी नाव न घेता थेट राष्ट्रवादीचे अध्यत्क्ष शरद पवारांच्या सांगण्यानंतरच अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्याचे त्यांनी सूचित केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार शंभर टक्के टिकले असते असा दावाही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केला.