मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे.महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टिका केली होती.त्यानंतर तांबे यांनी पुन्हा ट्विट करून सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे पुढे आले आहे.
महाविकास आघाडीकडून महाजॉब्स पोर्टलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई,राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील,कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक,उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे फोटो आहेत.मात्र महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याचा फोटो या जाहिरातीत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना,राष्ट्रवादीची ? असा सवाल तांबे यांनी ट्विटच्या माध्यामतून केला आहे.या नाराजी नंतर तांबे यांनी पुन्हा ट्विट केले आहे.
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.आघाडीचे गठन होत असतांना,ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे असाही प्रश्न तांबे यांनी केला आहे. ५ लाख युवा शक्ती कार्ड तयार करण्याचे काम, बेरोजगारांना ५००० रूपये बेरोजगारी भत्ता मिळावी ही मागणी काँग्रेसने केली आहे.नोकरी मेळाव्यांचे आयोजन ८० टक्के स्थानिकांना नोकरीची मागणी कोरोनाच्या काळात नोकरी गेलेल्या युवक,युवतींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे काम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून काही वर्षात केले असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.