मुंबई नगरी टीम
मुंबई : दूध उत्पादक शेतक-यांच्या मागणीसाठी आमचे आंदोलन आज अहिंसक व शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आम्ही सारे मुंबईकर दूध उत्पादकांच्या पाठीशी आहोत. पण सरकारने दुधाला योग्य भाव दिला नाही, शेतक-यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत व त्यांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आम्ही उग्र स्वरुपात करू असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रविण दरेकर यांनी आज राज्यातील ठाकरे-पवार सरकारला दिला.
गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान करावा आणि दुध खरेदीचा दर तीस रुपये करावा या प्रमुख तीन मागण्यासाठी आज भाजपतर्फे राज्याव्यापी आंदोलन करण्यात सुरु आहे. “शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…” अशी जोरदार घोषणाबाजी करत मुंबई भाजपतर्फे गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर महानंद डेअरीच्या समोर जोरदार आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आमदार विद्या ठाकूर, नगरसेविका प्रिती साटम,माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, आरपीआय युवा चे रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष भाजपचे संतोष मेढेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने मुंबईकर या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. दुधाला लिटरमागे ५ रुपये अनुदान दिले तर दुध भुकटीला अनुदान दिले होते व दुधाला वाजवी दर दिला होता. पण आता महागाई वाढली आहे. आता सरकारने गायीच्या दुधाला ३० रुपये दर आणि १० रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पण हे अनुदान सरसकट मिळायला हवे. कारण गेल्यावेळी ज्या प्रकारे अनुदान दिले गेले त्याचा फायदा काही ठराविक राजकीय पुढा-यांच्या संस्थांनाच झाला. ९० टक्के अनुदान पुढा-यांनी लाटले. शेवटच्या शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळाले नाही,” असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
“गावामध्ये हातात किटली घेऊन गावातील दूध संस्थेत दूध घ्यायला येणाऱ्या शेतकऱ्याला या अनुदानाचा खरा फायदा झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.महानंदच्या व्यवस्थापकांची यावेळी भेट झाली. आमच्या भावना ते राज्य सरकारकडे कळविण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण आमच्या या मागण्या शासन स्तरावर पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा महानंद डेअरी समोर आंदोलन छेडण्यात येईल व यामध्ये समस्त मुंबईकर यामध्ये सहभागी होतील असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.