मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या व्हिडीओला युट्यूबवर मोठया प्रमाणात डिसलाईक केल्याचे समोर आले होते. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून त्यांनी यामागे काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.
“गेल्या २४ तासांत मन की बात या व्हिडीओला नापसंती दर्शवण्याचा एकत्रित प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचा विश्वास इतका कमी आहे की, ते हा एक प्रकारचा विजय म्हणून साजरा करत आहेत. मात्र युट्यूबवरील डेटा असे सूचित करतो की यापैकी केवळ २ टक्के डिसलाईक हे भारतातील आहेत”, असे ट्वीट मालवीय यांनी केले. तर, आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणातात, “उर्वरित ८ टक्के लोक नेहमीप्रमाणे बाहेरून आले आहेत. परदेशातील बॉट्स आणि ट्विटर अकाऊंट्स काँग्रेसच्या जेईई आणि नीट विरोधी मोहिमेचा भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का?”, असा सवाल अमित मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑगस्टला रविवारी ‘मन की बात’ मधून देशवासियांना संबोधित केले होते. तर हा व्हिडीओ भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आला होता. मात्र या व्हिडीओवर लाईक पेक्षा डिसलाईक म्हणजेच नापसंती दर्शवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. पंरतु हा सर्व काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान, भाजपने आपली बाजू सावरली असली तरी जनतेने आपली नाराजी मात्र स्पष्ट व्यक्त केली आहे. मोदींनी मन की बातमध्ये जगातील खेळण्यांच्या व्यापाराविषयी भाष्य केले होते. मात्र गेल्या महिनाभरापासून जेईई आणि नीटपरिक्षांविषयी सुरू असलेल्या गोंधळाबाबत मोदी काहीच बोलेल नाही. त्यामुळे मोदींची मन की बात या कारणामुळे जनतेला खटकली असावी,अशी चर्चा आहे.