चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचे ‘नो कमेंट’

मुंबई नगरी टीम

मुंबई :  नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भावनिक साद घातली होती.एकवेळ चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यासमोर जाऊ नका, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर एकनाथ खडसे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. एकनाथ खडसे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सूचक मौन बाळगले.पक्ष बदलावर सुरू असणा-या चर्चेवर देखील त्यांनी काहीच न बोलणे पसंत केले.

पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.तसेच आपण लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. असे असतानाच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना भावनिक साद घातली होती. परंतु चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपण बोलणार नसल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.

काही दिवांपूर्वी एकनाथ खडसे मुंबईत आले होते. त्यामुळे नाराज खडसे शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीत जाणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यामुळे खडसे-पवार भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु अशी कोणतीही भेट होणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे वृत्तही एकनाथ खडसे यांनी खोडून काढले आहे. दरम्यान, नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे यांना पक्षाने पुन्हा डावलले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या नाराजीत अधिक भर पडल्याचे बालले जात आहे.

Previous articleमंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार! : चंद्रकांत पाटील
Next article…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही’, रोहित पवारांचे पडळकरांना जशास तसे उत्तर