मुंबई नगरी टीम
बारामती : राज्य सरकारचा नाकर्तेपणा समोर आला असून तो लपवण्याचे आणि सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम शरद पवार यांना आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरून का काम करतात याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले असता, त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस आज बारामतीच्या दौ-यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आम्हीच मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी राहण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. इतर मंत्री हे फिल्डवर असून सगळ्यांनीच तिथे जाणे आवश्यक नाही,असे म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शरद पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे.या सरकारचा नाकर्तेपणा समोर येत असून त्यामुळे असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणे हेच काम शरद पवारांकडे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री हे मुंबईतच बसून होते. आमचे दाैरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले,असे टीकास्त्रही देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तसेच राज्याने केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा स्वतः भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्याला टोलवाटोलवीची उत्तरे देण्यापेक्षा राज्य सरकार काय करणार हे स्पष्टपणे सांगावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी फडणवीसांनी राज्यपालांच्या विषयावरूनही मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यात वाद करत बसण्याची ही वेळ नाही. आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. राज्यपालांसोबत तुमचे जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. मात्र आता हा विषय नसून शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे महत्त्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.