शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू : फडणवीस

मुंबई नगरी टीम

लातूर : जी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी मुख्यमंत्री असताना घेतली होती,त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आता त्याचप्रमाणे मदत करावी अशी मागणी करतानाच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातीलऔसा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली त्यांनतर त्यांनीआशिव,शिवली मोड आणि बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.मी मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केलेले वक्तव्य जरी सद्यःस्थितीत पूर्ण केले तरी भरपूर आहे. अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्‍वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

दरम्यान आज फडणवीस यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. नुकसान होवून आठ दिवस झाले तरी प्रशासन पोहोचले नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे.जमीन मोठ्या प्रमाणात खरडली गेली आहे.त्यामुळे पुढचे पीक घेणे अशक्य आहे. आमच्या काळात यासाठी वेगळी मदत देण्यात आली होती असेही फडणवीस यांनी सांगितले.१ ते १४ ऑक्टोबर या काळात मोठा पाऊस झाला.या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेली पिके आणि कापलेली पिके दोन्हींचे मोठे नुकसान या पावसाने झाले असल्याने सरकारने तत्काळ पंचनामे संपवून, अगदी मोबाईल फोटो ग्राह्य धरून लगेच मदत दिली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.

यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सोलापूरात शेतक-यांना केलेल्या मदतीवर भाष्य केले.काल जसे ३८०० रुपयांचे धनादेश दिले,तशी थट्टा पुन्हा शेतकऱ्यांची करू नये,असेही त्यांनी स्पष्ट केले.जी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी घेतली होती,त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आता त्याचप्रमाणे मदत करावी असे सांगून फडणवीस यांनी त्या वक्तव्यांचे जुने व्हिडिओ पत्रकारांना दाखविले.ही वेळ राजकारण करायची नाही.अधिक संवेदनशील राहण्याची असून,सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविणे सुद्धा योग्य नाही.केंद्र सरकार तर मदत देईलच,केंद्र सरकारची प्रक्रिया सर्वांना ठावूक आहे. आधी राज्य सरकारला आपला प्रस्ताव सादर करावा लागेल.पंतप्रधान मोदीजी आधीच्या सरकारपेक्षा निश्चितपणे अधिक मदत करतील.तशी त्यांनी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राला केली आहे असे ते म्हणाले.

जीएसटी संदर्भात सातत्याने गैरसमज पसरवले जात आहेत.तो सुद्धा निधी राज्याला येतोय आणि यापुढेही येणार आहे.केंद्राकडे बोट आणि जीएसटीचे कारण याबाबत या तीन पक्षांमध्ये एकमत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.राजकीय भाष्य सोडून शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांना राजकारणात रस नाही. मलाही यात राजकारण आणायचे नाही असे स्पष्ट करतानाच या सरकारचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी सध्या शरद पवार यांना प्रयत्न करावे लागतात, हे दुर्दैवी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबत भाष्य केले.जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी,यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही.स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरी देण्यात आली असल्याने या योजनेची नक्की चौकशी करा असे आव्हान त्यांनी दिले.

Previous articleभाजपचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल एकनाथ खडसे उचलणार नाहीत
Next articleदेवेंद्र फडणवीसांच्या पोटात का दुखतय; राष्ट्रवादीचा सवाल