मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : “आम्हाला हे सरकार पाडण्यात रस नाही. जे सरकार स्वतःहून पडणार आहे त्यासाठी आम्ही का प्रयत्न करू आणि वेळ घालवू. महाविकास आघाडीचे सरकार पडणार हे शरद पवार यांना देखील माहित आहे, असा दावा माजी खासदार नेते निलेश राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दस-या मेळावेच्या भाषणात भाजपवर चांगलाचा घणाघात केला. त्यावरून आता निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निलेश राणे बोलत होते.विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये. सरकार स्थिर आहे सरकार पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, “हे सरकार पाडण्यात आम्हाला काही रस नाही हे भाजपच्या सर्व नेत्यांनी आधीच सांगितले आहे. जे स्वतःहून पडणार आहे, त्यासाठी आम्ही का प्रयत्न करू आणि वेळ घालवू.तुम्हाला येणारा काळच दाखवेल की, महाविकास आघाडीचे सरकार स्वतःहून कोसळणार आहे. कोणालाही हे सरकार पाडण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंना देखील हे माहित असून ते फक्त दिवस काढत आहेत. शरद पवार यांना देखील माहित सरकार पडणार आहे. म्हणून आम्हाला आणि आमच्या नेत्यांना तेवढा वेळ नाही. फक्त दुस-यावर बोट दाखवायचे आणि आपला वेळ काढायचा एवढंच आतापर्यंत शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी केले. उद्धव ठाकरे यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे”, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
यावेळी निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी भाषणात वापरलेल्या भाषेवरूनही त्यांच्यावर निषाणा साधला. एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा शोभत नाही. एका केंद्रीय मंत्र्यांबद्दल खालच्या थराला जाऊन बोलणे योग्य नाही. तुम्ही दुस-यांचे बाप काढलात तर आम्हीही तुमचे बाप काढू. आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत. भाषा आमचीही घसरू शकते. दुश्मन कीतीही मोठा असला तरी आम्ही परवा करत नाही. ज्या भाषेत उद्धव ठाकरे बोलतील त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. तुम्हाला ही धमकी वाटत असल्यास ती वाटू द्या. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना एकेरी बोलण्याचा लायसन्स आहे का?, असा सवालही त्यांनी केला. तसेच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ. कलानगरमध्ये काय चालते ते सर्व बाहेर काढू. हे सर्व किस्से ऐकण्यासाठी महाराष्ट्र कान टवकारून बसला आहे, असा इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला.