महाराष्ट्राशी बेईमानी करून हे मुख्यमंत्री झाले ; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्याला केलेल्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणे जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही.त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. मोदींच्या आशीर्वादाने तुमचे ५६ आमदार निवडून आले. अन्यथा २४ आमदारही आले नसते.उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण हे निर्बुद्ध बरळणे होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली पंतप्रधान मोदींमुळे ५६ आमदार निवडून आले. ते नसते तर २५ आमदारही निवडून आले नसते. उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले. मोदींचे नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. यावरही बोलताना राणे म्हणाले, कुणाला बेडूक म्हणता? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केले. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते. राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या ४० वर्षात जे पाहिले-ऐकले ते बाहेर काढेल, असा इशारा राणेंनी दिला आहे.

 माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. मात्र आताचे मुख्यमंत्री त्याला अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता.मुख्यमंत्र्यांची भाषा शिवराळ होती.आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची आब राखली. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, करोनाचे संकट याबाबत काहीही भाष्य त्यांनी केले नाही.मुख्यमंत्र्यांना काय बोलावे कसे बोलावे हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही,अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली. कोरोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण?, असा सवालही यावेळी नारायण राणेंनी केला.

Previous articleशरद पवारांनाही माहीत हे सरकार पडणार ; निलेश राणेचा दावा
Next articleकितीही टरटर केली तरी आकाश फाटणार नाही, पाऊस काही पडणार नाही: नवाब मलिक