मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून थकीत पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षाने सरकारवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. या घटना मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तर या घटनांसाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणारा का? याची जबाबदारी सरकार घेणार का ?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकारवर सडकून टीका केली आहे. “वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या. या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणा-या घटना आहेत.एसटी कर्मचा-यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दोन कुटुंब उघड्यावर आली आहेत”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, “आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?”, असे सवालही त्यांनी केले आहेत.
गेल्या तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आमहत्या केल्याचे समोर आले आहे. जळगाव येथील वाहक मनोज चौधरी यांनी थकीत पगार न मिळाल्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मुत्यूपूर्वी त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत एसटी महामंडळ आणि ठाकरे सरकार याला जबाबदार असल्याचे त्यांनी लिहले आहे. तर रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेहही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. याचा सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनांमुळे भाजप नेत्यांनी सरकारला धारेवर धरत पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे.