मुंबई नगरी टीम
मुंबई : बिहारमध्ये एनडीएने आपली सत्ता स्थापन केल्यास भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देणार, असे दावे केले जात आहेत. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले आहे. त्यामुळे नितीश कुमार हे जर मुख्यमंत्री झाले तर त्यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजे, असे शिवसेना खासदर संजय राऊत यांनी म्हटले.शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकते हे भाजपने महाराष्ट्रात अनुभवले आहे.त्यामुळे बिहारमधे भाजप आपल्या मित्रपक्षांशी तसे करणार नाहीत,असा टोला संजय राऊत यांनी हाणला.
बिहार विधानसभा निडवणुकीत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाची आठवणही करून दिली. बिहारमधे भाजपचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, असे एका सुरात सांगितले जात आहे. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजे. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजप आपल्या मित्रांशी तसे करणार नाही. शब्द फिरवल्यावर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपला त्यांना मुख्यमंत्री करावेच लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे देखील अभिनंदन केले. जे जिंकले त्यांचे अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रे नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. स्वतः पंतप्रधानांनी देखील अनेक सभा घेतल्या. मात्र 30 वर्षांच्या तेजस्वीने सर्वांच्या तोंडाला फेस आणला हे मान्य करावे लागेल,असेही संजय राऊत म्हणाले.