दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक
विखे यांचे टीकास्त्र
मुंबई, दि. 13 1 ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमिटींचे नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील नुकत्याच निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारसमारोहात ते बोलत होते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे, शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, सचिन गुजर, काशिनाथ लवाडे, राजेश परजणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
सत्कारमूर्तींचा गौरव केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना विखे पाटील यांनी राज्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कर्जमाफीसंदर्भात सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आणताना ते म्हणाले की, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतिक आहे.
या सरकारचे केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेण्याचे काम सुरु आहे. गोबेल्स नितीप्रमाणे केवळ मीडियात फोटो छापून स्वत:चीच पाठ थोपटून घेण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक आणिशेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणाऱ्या या सरकारच्या विरोधात जनतेचा असंतोष तीव्र झाला असून, नांदेडचा महानगर पालिका निवडणुकीचानिकाल यासरकारला जनतेने हाणलेली सणसणीतचपराक आहे. राज्याला अंधारात लोटणाऱ्या सरकारला आता नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा नैतिकअधिकारही राहिलेला नाही, असे विखे पाटील पुढे म्हणाले.